हैदराबाद- रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे, या काळात अशा लोकांनी सतत आपला रक्तदाब तपासत राहावा, असा सल्ला डॉक्टरांनी रविवारी झालेल्या वर्ल्ड हायपरटेन्शन दिनी दिला. अतिसंवेदनशील आणि वृद्धांना कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होतो, असे सिकंदराबादमधील केआएमएस रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. शिवा राजू यांनी सांगितले.
अशा व्यक्तींना डॉक्टर शिवा यांनी या काळात घरीच राहाण्याचा सल्ला दिला. सोबतच रक्तदाबासाठी नियमितपणे औषधोपचार करणे, घरीच रक्तदाबाची पातळी तपासत राहाणे आणि दररोज 3 ग्रॅमपेक्षा कमी प्रमाणात मीठयुक्त आहार घेण्याच्या टीपही त्यांनी दिल्या. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसात दोनपेक्षा अधिक वेळा कॉफी घेणे किंवा दारू आणि पेन किलरचे सेवन टाळावे.