नवी दिल्ली- 'हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन' या औषधावरील निर्यातबंदी शिथील करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, अशा काही देशांना भारत हे औषध पुरवणार आहे असे सरकारने जाहीर केले आहे. यासोबतच या प्रकरणाचे राजकारण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांनाही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले आहे.
कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. या विषाणूवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र काही चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे, की हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन या मलेरियाच्या औषधाचा कोरोनाच्या रुग्णांवरही चांगला परिणाम दिसून येत आहे. देशात या औषधाचा साठा उपलब्ध आहे. मात्र देशाची लोकसंख्या पाहता भविष्याचा विचार करून या औषधाच्या निर्यातीवर केंद्राने बंदी आणली होती.