हैदराबाद -पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत.
शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिक आंदोलन करत आहेत. याचबरोबर न्यायाधीश उपलब्ध नाहीत. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आरोपींना महबूबनगर येथील 'फास्ट ट्रॅक' न्यायालयामध्ये हजर करू शकत नाही. त्यामुळे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश शादनगर पोलिस ठाण्याला दिले आहेत.
शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिक आंदोलन करत आहेत. आरोपींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी, मागणी आंदोलकाकडून करण्यात येत आहे. याबरोबरच आरोपींना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सहाय्य करणार नाही, असा निर्णय शादनगर बार असोशिएशनने घेतला आहे.
कशी घडली घटना -
बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना महिलेच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा चार आरोपींनी महिलेवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता. तसेच त्यांचा मृतदेह जाळला होता. शेवटी महिलेचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.