हैदराबाद - लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक सेवांसह ओला उबरसारख्या टॅक्सी सेवाही बंद आहेत. खासगी वाहन जर बाहेर काढले तर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस कारावाई होते. नागरिकांना अत्यावश्यक कामांसह इतरही कामांसाठी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. यावर हैदराबादमधील राचाकोंडा पोलिसांनी अभिनव उपाय शोधला आहे. गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक किंवा इतर कारणांनी आजारी असलेल्या नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी शहरातील राचाकोंडा पोलिसांनी खास गाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.
आणीबाणीची परिस्थितीत रुग्णालयात जाणे आवश्यक असलेल्यांसह इतर अनेक कामांसाठी पोलिसांनी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. जसे की, डायलेसिस, गर्भवती महिलांची तपासणी, शस्त्रक्रियेनंतरची तपासणी, लहान मुलांशी निगडीत समस्या, किराणा मालाची निकड, वयोवृद्ध नागिराकांना औषधै, बँकेतील कामे, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना पेन्शनच्या कार्यालयातील कामासाठी गरजेचे असले तरी टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. अशा विविध कारणांसाठी पोलिसांनी प्रवासाची सोय केल्यामुळे राचाकोंडा पोलिसांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्रानेही हैदराबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवासाच्या समस्या येत आहेत. हैदराबाद पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांनीही खास गाड्यांची सेवा सुरू करावी, त्यामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होतील.
पोलीस आयुक्त महेश भागवत यांचा पुढाकार
राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी श्रीनिवास टुर्स अॅड ट्रॅव्हल्स कंपनीच्या सहकार्याने ही सेवा सुरू केली आहे. आणीबाणीच्या काळात प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक मागण्या राचाकोंडा पोलिसांकडे येत होत्या. त्यावर उपाय काढत टॅक्सी सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.