हैदराबाद -येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला. या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. या एन्काऊंटरनंतर हैदराबादमध्ये आणि देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जनतेकडून तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र काही राजकीय नेते, विचारवंत यांनी अशा प्रकारे एन्काऊंटरचा मार्ग अवलंबणे किंवा तसा पायंडा पाडणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम
मला या एन्काऊंटरसंबंधी पूर्ण माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे जबाबदार व्यक्ती म्हणून मला वाटते. खरोखरच आरोपी पळून चालले होते आणि एन्काऊंटर करण्यात आला, असेच घडले किंवा नाही, याचा शोध घ्यावा लागेल.
काँग्रेस खासदार हुसैन दलवाई
अशा प्रकारे गुन्हेगारांचा एन्काऊंटर करणे हा योग्य मार्ग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीसच कायदा हातात घेत आहेत. या प्रकाराची चौकशी केली पाहिजे. लोक पोलिसांचे अभिनंदन करत असले तरी, एन्काऊंटर करणे योग्य ठरवता येणार नाही.
हरियाणा काँग्रेस अध्यक्ष शेलजा कुमारी
न्यायव्यवस्थेच्या मार्गाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येईल, यावर नागरिकांना विश्वास असणे आवश्यक आहे.
खासदार अरविंद सावंत, शिवसेना (लोकसभा)
महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी सक्षम कायदा बनणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व्हावी. सध्याची न्यायप्रक्रिया खालच्या न्यायालयांपासून सुरू होते आणि वर्षानुवर्षे वेगवेगळ्या न्यायालयात ते चालतच राहतात. मी अध्यक्षांना या मुद्द्यावर चर्चेसाठी समिती स्थापन करावी, अशी विनंती करतो.
भाजप खासदार मेनका गांधी
जे झाले ते खूप भयानक होते. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. त्यांना काहीही झाले तरी, न्यायालयीन प्रक्रियेद्वारेच फाशीची शिक्षा मिळणे आवश्यक होते. तुम्ही त्यांना न्यायालयीन प्रक्रियेआधीच गोळ्या घालणार असाल तर न्यायालये, कायदा आणि पोलिसांचा उपयोग काय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
बलात्काराच्या घटना उशिरा उजेडात येतात. तसेच, न्यायप्रक्रियेलाही वेळ लागतो. त्यामुळे उन्नाव असो किंवा हैदराबाद लोकांच्या मनात याविषयी राग आहे. त्यामुळेच लोक गुन्हेगारांचा एन्काऊंटर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. याशिवाय, लोकांना गुन्ह्याविरोधात न्याय मिळेल, असा विश्वासच राहिलेला नाही. त्यांचा कायदा आणि न्यायावरील विश्वास उडाला आहे, ही बाब अधिक चिंतेची आहे. यामध्ये व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी सर्व सरकारांनी एकत्र येण्याची गरज आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर
कोणतेही तपशील समोर येण्याआधीच काही प्रतिक्रिया देणे किंवा निषेध करणे घाईचे ठरेल.
रेखा शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग
आम्ही अशा गुन्हेगारांसाठी नेहमीच फाशीच्या शिक्षेची मागणी करतो. मात्र, येथे पोलीसच सर्वोत्तम न्यायाधीश बनले आहेत. मला माहीत नाही की, हे कोणत्या परिस्थितीत घडले. एक नागरिक म्हणून मी या गुन्हेगारांना मिळालेल्या शिक्षेबद्दल आनंदी आहे. हेच त्यांच्यासाठी योग्य होते. मात्र, हे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे घडले असते तर, चांगले झाले असते. हे योग्य प्रक्रियेद्वारे होणे आवश्यक होते.