बंगळुरु - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. मात्र, लोक त्याला गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यामध्ये शेकडो गावकरी धार्मिक मेळ्यात सहभागी होण्यासाठी रस्त्यावर जमा झाल्याचे पाहायला मिळाले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने यंदा मेळा भरण्यास परवानगी नाकारली असतानाही, जिल्ह्यातील कर्जागी गावात ब्रह्मलिंगेश्वर मेळा भरवण्यात आला. या मेळ्यात गावातील शेकडो नागिरकांनी भाग घेतला.
मेळ्यात सहभागी झालेल्या लोकांनी मास्कही लावले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही त्यांनी पालन केले नाही. योगायोगाने कर्नाटकात अशी पहिली घटना नाही. यापूर्वी मे महिन्यात, पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने रामानगर जिल्ह्यात ग्राम मेळ्यासाठी परवानगी दिल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.
सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.