- 04:00 PM :दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला ११ वर. मृतांच्या नातेवाईकांना मिळणार एक कोटींची मदत, तर व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत मिळणार आहे.
- 03:00 PM :दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी एक कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा..
- 02:45 PM : दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत दहा जणांचा झालाय मृत्यू. एनडीआरएफच्या महासंचालकांची माहिती.
- 02:00 PM :आज झालेल्या वायुगळती दुर्घटनेबाबत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्र प्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे.
- 02:00 PM :मुख्यमंत्री रेड्डी किंग जॉर्ज रुग्णालयामध्ये दाखल..
- 01:08 PM :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी विशाखापट्टणमला रवाना..
- 12:36 PM :वायुगळती हा अपघातच होता, कंपनी सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत होती. याबाबत अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिकचे पथक पाठवण्यात आले आहे. -दामोदर गौतम सवंग ,आंध्र प्रदेश पोलीस महासंचालक
- 12:26 PM :सध्या रुग्णालयातील काही लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही दुर्घटना कशी घडली, याचा तपास सुरू आहे. - दामोदर गौतम सवंग ,आंध्र प्रदेश पोलीस महासंचालक
- 12:22 PM :वायूगळतीची माहिती मिळताच तातडीने प्रशासनाला आणि पोलिसांना कळवण्यात आले होते. त्यानंतर वायूला निष्प्रभ करण्यात आले. या वायूगळतीसाठी संबंधित कंपनीने जबाबदारी घ्यायला हवी. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंपनीने काय केले, आणि काय नाही केले हे त्यांनी पुढे येऊन सांगायला हवे. त्यानंतर कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - राज्य उद्योग मंत्री एम. जी. रेड्डी.
- 11:50 AM : दुर्घटनेमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
- 11:30 AM : विशाखापट्टणम दुर्घटनेबाबत देशाच्या राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला आहे.
- 11:00 AM : वायूगळती झालेल्या भागातील स्थानिकांना घसा खवखवणे, त्वचेला खाज येणे असे प्रकार दिसून आल्यानंतर याबाबतची माहिती मिळाली. विषारी वायूचा संसर्ग झाल्यामुळे हे होत होते. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करत आतापर्यंत सुमारे पंधराशे लोकांना गावांमधून इतरत्र हलवले आहे. यांपैकी ८००हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. - एस. एन प्रधान, महासंचालक एनडीआरएफ.
- 10:50 AM :आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सरकारला सल्ला दिला आहे, की त्यांनी एनडीआरएफच्या सोबतीला रेड क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांनाही बचावकार्यात सहभागी करुन घ्यावे. यासोबतच त्यांनी विशाखापट्टणमच्या रेड क्रॉस शाखेला वैद्यकीय कॅम्प उभारण्याचे आदेश दिले आहेत.
- 10:40 AM :या घटनेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. केंद्र सरकारकडून याप्रकरणी संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासनही मोदींनी दिले आहे.
- 10:35 AM :विशाखापट्टणममध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांसोबत मी चर्चा केली आहे. आम्ही सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. रुग्णालयांमध्ये असलेल्या, तसेच आसपासच्या गावांमधील लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
- 10:30 AM :बचावकार्यामध्ये एनडीआरएफचे २७ जवान सहभागी आहेत. अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सर्व प्रशिक्षित आहेत. सध्या ८० ते ९० टक्के लोकांना गावांमधून हलवण्यात आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. - एनडीआरएफ महासंचालक.
- 10:23 AM : विशाखापट्टणमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांची भेट घेतली.
- 10:20 AM : विशाखापट्टणम वायू गळती घटनेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवसाथापन विभागाची बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे.
- 10:00 AM : पंतप्रधान मोदींनी वायूगळतीच्या घटनेचा आढावा घेतला. गृहमंत्रालयातील अधिकारी, आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. यासोबतच, या दुर्घटनेचा परिणाम झालेल्या सर्व लोकांच्या चांगल्या आणि सुरक्षित आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
- 9:40 AM : आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे वायझॅकला जात आहेत. तेथून ते किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांची भेट घेतील.
- 9:30 AM: गळती झालेल्या वायूचे नाव स्टायरीन होते. आम्ही आजूबाजूची गावे रिकामी करण्यात आली असून, आम्ही घरोघरी जाऊन तपासणी करत आहोत अशी माहिती विशाखापट्टणम शहर पोलीस आयुक्त आर. के मीना यांनी दिली आहे.
- 9:28 AM : गळती झालेल्या वायूचा प्रभाव नाहीसा करण्यात आला आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक पोहोचले आहे. या वायूचा वास जरी दोन-अडीच किलोमीटरच्या व्यासात पसरला असला, तरी याचा गंभीर परिणाम हा एक ते दीड किलोमीटच्या टप्प्यातच होता. सुमारे १२० लोकांना रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, आतापर्यंत एका लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. - आर. के. मीना, विशाखापट्टणम शहर आयुक्त.
विशाखापट्टणम -आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह आठ जणांचा यात मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील गावे रिकामी केली आहेत.
आरआर वेंकटपुरम गावात आज पहाटे एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. त्यामुळे एका लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. विषारू वायूमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत. अनेक लोकांना सध्या स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विषारी वायूचा प्रादुर्भाव जवळपास दोन ते तीन किलोमिटर पर्यंत पसरला आहे.