आता पावसाळा सुरु झाला आहे. आधीचा कोरोनाचा कहर सुरु असताना इतरही साथीच्या आजारांची भीती आपल्यापुढे आहेच. पावसाळ्यात दुषित पाणी, अन्न आणि अस्वच्छतेमुळे वेगाने फैलावणारा संक्रमणजन्य आजार म्हणजे कॉलरा. त्याला पटकी असेही म्हणतात. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे जुलाब आणि उलट्या होणे. स्वल्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या'व्हिब्रिओ कॉलेरी' या जिवाणूमुळे हा रोग होतो. दुषित पाण्यामध्ये हा जिवाणू आढळतो.
दुषित अन्न, पाणी, न शिजवलेले किंवा कच्चे अन्न, मासे याद्वारे कॉलरा जलद पसरतो. पटकी रोगाच्या लक्षणामध्ये तीव्र पाण्यासारखे जुलाब आणि उलट्यांचा समावेश होतो. उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता ओढवून निर्जलीकरण होते. शरिरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होतो, नाडी वेगाने चालते, व्यक्तीचे डोळे खोल जातात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वरित उपचार न झाल्यास मृत्यू ओढवतो. या रोगात जिवाणू आतड्याला सूज आणतात त्यामुळे आतड्यातील पेशींकडून अनियंत्रितपणे पाणी सोडले जाते व खूप जुलाब होतात.
कसा पसरतो कॉलरा ?
एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे कॉलरा विष्ठेमुळे दुषित झालेल्या पाण्यातून पसरतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून प्यायलेले कधीही चांगले. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉलर्याचा फैलाव होतो. संक्रमित व्यक्तीने स्वत:ची नीट स्वच्छता घेतली नाही, तर तो स्वत:च आजाराचा वाहक बनतो. पाण्याच्या साठ्यामध्ये मलमूत्र येणार नाही याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रादुर्भाव होत नाही.
भारतात कधी आला कॉलरा?
1817 साली प्रथम कॉलरा दक्षिण आशियायी देशांमध्ये पसरला
1829 साली कॉलराची साथ भारतात पसरली त्यानंतर 1899 पर्यंत चार वेळा कॉलराची साथ येवून गेली. यामध्ये हजारो जण दगावले.