नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) संयुक्त राष्ट्राच्या ७५व्या महासभेच्या सत्राला संबोधित केले. यावेळी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून त्यांनी भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला. गेल्या अनेक वर्षांपासून भारत ही मागणी करत आला आहे. 'संयुक्त राष्ट्राच्या निर्णय घेणाऱ्या गटापासून भारताला किती दिवस दूर ठेवणार', असा सवाल त्यांनी जगाला केला.
'जेव्हा आम्ही कमकुवत होतो. तेव्हा आम्ही जगाला अडचणीत आणले नाही. मात्र, आम्ही शक्तिशाली झालो, तेव्हा जगावरचे ओझेही बनलो नाही. तरीही, आम्ही किती दिवस वाट पाहायची? भारताने यूएनच्या शांती सेनेमध्ये आपले जवान पाठवले. त्यात अनेक जवानही गमावले. जगाच्या कल्याणाचा भारताने कायमच विचार केला आहे', असे मोदी म्हणाले.
'आम्ही तिसरे महायुद्ध यशस्वीरित्या टाळले. मात्र, अनेक युद्धे आणि नागरी संघर्षही झाले, हे आम्ही नाकारत नाही. दहशतवादी हल्ल्यांनी जगाला धक्का दिला. सगळीकडे रक्त सांडले. यामध्ये तुमच्या-आमच्यासारख्यांचे प्राण गेले. यात लहान मुलांचाही मृत्यू झाला', असे मोदी म्हणाले.
गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. या संकटात संयुक्त राष्ट्र महासभा कुठे आहे?, संयुक्त राष्ट्रात बदल करण्याची मागणी केली जात आहे. भारतामध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 18 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या राहते. भारतात झालेल्या बदलाचा परिणाम जगावरही होतो. त्यामुळे यूनमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या देशाला संयुक्त राष्ट्राच्या निर्णय घेणाऱ्या गटापासून भारताला किती दिवस दूर ठेवणार, असा सवाल त्यांनी केला.