महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार निवडणुकीतील प्रचार कसा बदलतोय; पाकिस्तान, पुलवामा घटनांच्या चर्चेचे कारण काय?

प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. बिहारमधील प्रचारात अचानक बदल झालेला पाहायला मिळाला. भाजपाकडून प्रचारादरम्यान पाकिस्तान, चीन आणि पुलवामा प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

By

Published : Oct 31, 2020, 9:34 PM IST

बिहार निवडणुकीतील प्रचार कसा बदलतोय; पाकिस्तान, पुलवामा घटनांच्या चर्चेचे कारण काय?
बिहार निवडणुकीतील प्रचार कसा बदलतोय; पाकिस्तान, पुलवामा घटनांच्या चर्चेचे कारण काय?

पाटणा - बिहारमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात 3 टप्प्यात मतदान आहे. 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. बिहारमधील राजकीय प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. बिहारमधील प्रचारात अचानक बदल झालेला पाहायला मिळाला. भाजपाकडून प्रचारादरम्यान पाकिस्तान, चीन आणि पुलवामा प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

बिहार निवडणूक प्रचार पुलवामा घटेनवर कसा पोहोचला?

पाकिस्तान संसदेत पुलवामा हल्ल्याचा उल्लेख झाला. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत बोलताना, पुलवामात केलेला यशस्वी हल्ला हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झाला. हा संपूर्ण पाकिस्तानी जनतेचा विजय होता, असे वक्तव्य केले. मंत्री चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर बिहार निवडणुकीत अचानक पुलवामा हल्ल्याचा उल्लेख सुरू झाला.

राहुल गांधी

विरोधकांचे प्रचारातील मुद्दे -

नोटबंदी, लॉकडाऊन, उद्योग, व्यवसाय, बेरोजगारी हे राहुल गांधींच्या प्रचारातील मुद्दे राहिलेले आहेत. त्यांनी बोलताना याच मुद्द्यांवर भर दिला आहे. काँग्रेसने देशाला दिशा दिली. आम्ही मनरेगा योजना राबवली, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. देश कसा चालवायचा हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलो. रोजगार निर्माण केला. मात्र, आम्ही एका गोष्टीत कमी पडलो. ते म्हणजे आम्हाला खोटं बोलता आलं नाही. खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदींसमोर आम्ही कमी पडलो, असा मार्मिक टोला राहुल यांनी लगावला.

भाजपच्या प्रचारात कसा बदल होतोय?

पंतप्रधान मोदींनी अनेक प्रचार सभा घेतल्या. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. जे आम्हाला राम मंदिराची तारीख विचारत होते तेच आज आमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. आम्ही जे बोललो ते करून दाखवले, असे पंतप्रधान मोदी रॅलीदरम्यान म्हणाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या प्रचारातील मुद्दे बदलले आहेत. विशेषत: भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या भाषणात पाकिस्तान, पुलवामा हल्ला या घटनांचा उल्लेख येताना दिसत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या आजच्या भाषणातही, काँग्रेस कसा पाकिस्तानधार्जिणा पक्ष आहे, याचाच उल्लेख येत आहे.

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींकडून पुलवामाचा गुजरातेतही उल्लेख -

ज्यावेळी पुलवामा हल्ल्यात आपले वीर जवान शहीद झाले म्हणून देश दु:खात होता. त्यावेळी काही लोक त्यात सहभागी न होता राजकीय स्वार्थ साधण्याचे काम करत होते. त्यांना देश कधी विसरणार नसल्याचे मोदी म्हणाले. देश हे कधीच विसरणार नाही की देशावर एवढा मोठा आघात झाला होता. त्यावेळी स्वार्थ आणि अंहकाराने भरलेली राजकीय वृत्ती कोणत्या स्तरावर पोहोचली होती. गेल्या काही दिवसात शेजारील देशातून ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. ज्याप्रकारे तेथील संसदेत पुलवामा हल्ल्याचे सत्य समोर आले. त्यामुळे आपल्यातील राजकीय लोकांचा खोटा मुखवटा देशाच्या समोर आला असल्याचेही मोदी म्हणाले.

काय म्हणाले जे.पी.नड्डा?

काँग्रेस, सीपीआय हे पक्ष पाकिस्तानचे प्रवक्ते बनलेले आहेत. बिहारची जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल, असे एका रॅलीदरम्यान बोलताना ते म्हणाले. बिहारच्या हाजीपूर येथे नड्डा यांनी रोड शो केला.

जे.पी.नड्डा

राजनाथ सिंहांच्या भाषणातील मुद्दे काय आहेत?

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या बोलण्यात देशप्रेम, राष्ट्रवाद, सैनिक, लष्करे, पाकिस्तान, पुलवामा या घटनांचा उल्लेख आढळून येत आहे. 'काँग्रेसने आपल्या सैनिकांच्या शूरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चीनने आपली १२०० स्क्वेअरमीटर जमीन हडपल्याचे विरोधकांकडून सांगितले जाते. मात्र, मी जर एक घोषणा केली तर त्यांना त्यांचे तोंड लपवणे कठीण होऊन जाईल, असे सिंह आज पाटण्यात बोलताना म्हणाले.

राजनाथ सिंह

पुलवामा घटनेचा राजनाथ सिंहांकडूनही पुनरुच्चार -

'पुलवामा हल्ल्यात आपल्या ४० जवानांना वीरमरण आले तेव्हा मी देशाचा गृहमंत्री होतो. त्यावेळी काँग्रेसने आमच्यावर खूप आरोप केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपने हे कारस्थान केले. अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा आम्ही घरात बसू' असे राजनाथ सिंह म्हणाले.

पुलवामा घटनेबाबत बोलण्याची ही योग्य वेळ नाही - तेजस्वी

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या भाषणातील मुद्दे भाजप नेत्यांच्या तुलनेत पूर्णत: वेगळे असल्याचे दिसून येत आहे. तेजस्वी यादव यांच्यामते, बिहारमधील सरकार कधीच योग्य मुद्यांवर बोलत नाही. पुलवामाच्या घटनेबाबत बोलण्याची ही वेळ नाही. आता केवळ आणि केवळ बिहारच्या जनतेचे मुद्दे ऐकले गेले पाहिजेत. शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीवर बिहारची जनता बोलू इच्छित आहे, असे तेजस्वी म्हणत आहे.

तेजस्वी यादव

नितीश कुमारांना तेजस्वींचा सवाल -

'नितीशजी हे मान्य करतात, की आपल्या सरकारच्या 15 वर्षांत त्यांनी राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि उद्योगांचा सत्यानाश केला. त्यांनी दोन पिढ्यांचे वर्तमान आणि भविष्यही उद्ध्वस्त केले. ते बेरोजगारी, रोजगार, उद्योग, गुंतवणूक आणि स्थलांतर याविषयी काहीही बोलत नसल्याचे हेच कारण आहे. त्यांनी या मुद्द्यांवर का बोलू नये?' असा सवालही तेजस्वी यादव यांनी केला आहे.

कन्हैय्या कुमार

डाव्या पक्षांचा प्रचार कसा सुरू आहे?

सीपीआयचे स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांच्याही राज्यात मोठ्या सभा होत आहेत. भाजपा आणि जदयू यांच्याकडून जातीधर्मात भांडणे लावायचे कामं होतात. हे थांबवून त्यांनी सामाजिक सलोखा जपायला हवा, असा कन्हैय्याच्या भाषणातील सूर दिसून येतो. भाजपाने मंदिर, पाकिस्तान, पुलवामा या घटनांऐवजी रोजगार, आरोग्य, शिक्षण या विषयांवर राजकारण करावे. विकासाच्या राजकारणाची बिहारला गरज आहे, असा उल्लेख कन्हैय्या करताना दिसून येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details