नवी दिल्ली -गुजरातमधील एका शाळेत महात्मा गांधीजींविषयी विचारलेल्या प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 'महात्मा गांधीजींनी आत्महत्येचा प्रयत्न कसा केला' हा प्रश्न गुजरातमधील ९ वीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षेत विचारण्यात आला होता. 'सुफलाम शाला विकास संकुल' या बॅनरअंतर्गत संचलित शाळांच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता.
'गांधीजींनी आत्महत्या कशी केली?' असा या प्रश्नाचा अनुवाद करण्यात आल्यामुळे हा वाद निर्माण झाला. गांधीजींच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, याविषयी माहिती उपलब्ध आहे.
'गांधीजींना लहानपणी त्यांच्या नातेवाईकासह बीडी पिण्याची सवय लागली होती. मात्र, त्यांच्याकडे फारसे पैसे नसत. त्यामुळे त्यांनी नोकराच्या खिशातून पैसे चोरण्यास सुरुवात केली. मात्र, ही सवय लागल्यानंतर गांधीजींना आपण कोणतेच काम स्वतः करू शकत नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांना नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्येचा विचार केला. यादरम्यानच त्यांना धोत्र्याचे बी विषारी असून ते खाल्ल्याने मृत्यू होतो, हे माहिती झाले. त्यांनी ते या बिया घेऊन जंगलात आले. मात्र, त्यांची त्या बिया खाण्याची हिंमत झाली नाही,' अशी घटना आहे. मात्र, प्रश्नाचा अनुवाद चुकीचा झाल्याने हा वाद निर्माण झाला.