नवी दिल्ली -कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. झाशीवरून कानपूरला आणण्यात येत असताना पोलीस ताफ्यातील एका कारचा अपघात झाला, त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र हिसकावत गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. मात्र, चकमक होण्याआधी काही तास सर्वोच्च न्यायालयात एक याचिक दाखल झाली होती. विकास दुबेची पोलीस चकमकीत हत्या होऊ नये म्हणून न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला आदेश द्यावे असे, याचिकेत म्हटले होते.
महाराष्ट्रातील वकील घनश्याम उपाध्याय यांनी काल (गुरुवार) रात्री उशिरा जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. जर विकास दुबेला सुरक्षा दिली नाही तर त्याच्या इतर साथीरादारांप्रमाणे पोलिसांच्या चकमकीत हत्या होऊ शकते, असे याचिकेत म्हटले होते. उपाध्याय यांनी अनेक माध्यमांचा हवालाही दिला होता. पोलीस चकमक टाळण्यासाठी विकास दुबेने स्वत: ला अटक करून घेतले होते.