नवी दिल्ली -कोरोना विषाणूच्या लढ्यात भारत सातत्याने प्रगती करत आहे. भारतात दोन कोरोना विषाणूच्या लसी यापूर्वीच मंजूर झाल्या आहेत. त्याचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता भारतात तिसरी लसही येण्याच्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली.
सीरम संस्था ही नोव्हाव्हॅक्स (Novavax) या कोरोना विषाणूवरील आणखी एका लसीच्या चाचणीत भागीदार आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी ठरली आहे. भारतात या लसीचे ट्रायल सुरू करण्यासाठी आम्ही आवेदन केले आहे. जून 2021 पर्यंत कोवाव्हॅक्स लस लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे, असे टि्वट पुनावाला यांनी केले आहे.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू झाली आहे. भारतात सीरम इन्सिट्यूट, भारत बायोटेक या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्सिट्यूट ही मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण तर भारत बायोटेक ही संपूर्णपणे स्वदेशी लस आहे.
कोरोना लसीचे उत्पादन सीरमच्या फॅसिलिटीतच -
लस निर्मितीमध्ये पुण्यातील सीरम कंपनी जगभरात आघाडीवर आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सीरम कंपनीने लस निर्मितीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका फार्मा कंपनीसोबत सहकार्य केले. त्यानुसार लसीवर संयुक्तपणे संशोधन करण्यात आले. सोबतच सीरम कंपनीत मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन सीरमच्या फॅसिलिटीतच करण्यात येत आहे.