लखनऊ : उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय गर्भवती मुलीची तिच्या वडिलांनी आणि भावाने मिळून हत्या केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. हत्या केल्यानंतर या दोघांनी तिचा मृतदेह पुरुन टाकला होता. मुलगी अल्पवयीन असताना गर्भवती झाल्याने, कुटुंबाची बदनामी केली म्हणून तिची हत्या करण्यात आली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गुन्हा कबूल केला असून, भाऊ सध्या फरार आहे. मंगळवारी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. ही मुलगी २३ सप्टेंबरपासून बेपत्ता होती, मात्र तिच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रार दाखल केली नव्हती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला मारहाण करत गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचे शिर धडावेगळे करुन, तिचा मृतदेह नदीकिनारी पुरण्यात आला होता.
मुलगी गर्भवती असल्यामुळे लोक आपल्याला नाव ठेवत होते, त्यामुळे आपण हे दुष्कृत्य केल्याची कबुली तिच्या वडिलांनी दिली आहे. या हत्येमध्ये तिचा भाऊही सामील होता. यासंदर्भात आम्ही तिच्या आईची आणि इतर कुटुंबीयांची चौकशी केली. मात्र त्यांचा यात सहभाग असल्याचे अद्याप समोर आले नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस. आनंद यांनी दिली.
ही मुलगी एका नातेवाईकाकडे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आपण गर्भवती असल्याचे या मुलीने घरच्यांना सांगितले नव्हते. तिचे पोट पुढे आल्यानंतर घरच्यांना याबाबत माहिती मिळाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ती कोणामुळे गर्भवती राहिली त्या व्यक्तीचे नाव तिने सांगितले नव्हते. पोलीस सध्या त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो असेही आनंद यांनी सांगितले.
हेही वाचा :हाथरस प्रकरण : एसआयटीला तपास अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ