हैदराबाद - भारताच्या २०११च्या जनगणनेमध्ये 'बेघर कुटुंबा'ची व्याख्या दिलेली आहे. ज्यांचे कोणतेही स्थायी निवासस्थान नाही, जे फुटपाथ, मंदिर, रेल्वे स्थानक किंवा फ्लायओव्हरखाली अशा ठिकाणी राहतात, हे सर्व बेघर प्रकारात मोडतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अशा बेघर लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २०११च्या आकडेवारीनुसार देशात १.७ दशलक्षाहून अधिक बेघर लोक आहेत. यांमधील सुमारे नऊ लाख लोक हे शहरी भागात राहतात.
काही स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांमध्ये असे समोर आले आहे, की भारताच्या लोकसंख्येच्या एक टक्के लोक हे बेघर आहेत. म्हणजेच देशातील शहरांमध्ये एकूण मिळून सुमारे ३० लाख लोक बेघर आहेत. केवळ देशाच्या राजधानीमध्येच सुमारे दीड ते दोन लाख लोक बेघर आहेत. यांमध्ये सुमारे दहा हजार महिलांचा समावेश आहे. आणखी एका अहवालानुसार, जगातील रस्त्यांवर राहणारी सर्वाधिक लहान मुले भारतातच आहेत.
बेघर लोकांची राज्यनिहाय आकडेवारी.. देशाच्या विविध शहरांमधील बेघर लोकांची अंदाजे संख्या पुढीलप्रमाणे..
- दिल्ली - 1,50,000 - 2,00,000
- चेन्नई - 40,000 - 50,000
- मुंबई - 2,00,000 (नवी मुंबईसह)
- इंदूर - 10,000 - 12,000
- विशाखापट्टणम - 18,000
- बंगळुरू - 40,000 - 50,000
- हैदराबाद - 60,000
- अहमदाबाद - 1,00,000
- पाटणा - 25,000
- कोलकाता - 1,50,000
- लखनऊ - 19,000
लॉकडाऊनमुळे या बेघर लोकांना पुढील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे..
- खाण्या-पिण्याची वानवा
- लोकांना आपल्या गावी जाता येत नसल्यामुळे शहरातील बेघरांची संख्या वाढली आहे.
- कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता अधिक.
- स्वच्छ जागा, सुरक्षा साधनांचा अभाव.
- माहितीचा, पर्यायाने जागरुकतेचा अभाव.
बेघर लोकांच्या मदतीसाठी पुढे आलेले काही हात..
- दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी बेघर लोकांसाठी मोफत जेवणाची घोषणा केली आहे.
- हातावर पोट असणाऱ्या मजूरांसाठी आणि शहरातील बेरोजगारांसाठी निवारा केंद्रांची सोय.
- उत्तर प्रदेशातील एका पोलिसाने आपल्या घरीच सार्वजनिक मोफत भोजनालय सुरु केले.
- महाराष्ट्र सरकारने सीएसआरमधून बेघर लोकांना मदत करण्याचे खासगी कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
- कोटामध्ये राहणारे विद्यार्थी हे आपापल्या वसतीगृहांच्या खानावळींमध्ये जेवण बनवून ते बेघर लोकांना देत आहेत.
हेही वाचा :भारतात 5 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; 149 जणांचा मृत्यू