नवी दिल्ली -निमलष्करी दलात 'ट्रान्सजेंडर' म्हणजेच तृतीयपंथीयांची भरती करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय गंभीरपणे विचार करत असून विविध निमलष्करी दलांकडे सूचना मागविल्या आहेत. निमलष्करी दलात 'असिस्टंट कमांडंट' पदावर तृतीयपंथीयांची भरती करण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे.
गृहमंत्रालयाचे सचिव एस. मुथू कुमार यांनी सही केलेले एक पत्र विविध निमलष्करी दलांना पाठविण्यात आले आहे. सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स यांना 2020 साली होणाऱ्या असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीबाबत हे पत्र पाठविण्यात आले आहे. या भरतीमध्ये पुरुष, स्त्री या दोन लिंगाच्या रकान्यासह तृतीयंपथीयांची भरती करण्यासाठी तिसरा रकाना देण्याबाबत तुमच्या सूचना पाठवा, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर या मुद्द्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.