नवी दिल्ली - 'एसपीजी' सुधारणा विधेयकाला राज्यसभेतही मंजूरी मिळाली आहे. लोकसभेत यापूर्वीच हे विधेयक पास झाल्यामुळे आता 'एसपीजी' सुरक्षा ही फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबालाच मिळेल, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणार नाही, याच्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.
एसपीजी सुरक्षा विषयावर राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एसपीजीचाच का हट्ट धरला जात आहे. एसपीजी हा कोणाचा 'स्टेटस' होता कामा नये. गांधी परिवाराची सुरक्षा काढण्यात आलेली नाही, ती बदलण्यात आली आहे. केरळमधील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या हत्येवरूनही त्यांनी टीका केली. काँग्रेस खासदारांच्या सभात्यागाच्या गोंधळात हे विधेयक पास करण्यात आले.
हेही वाचा -एकाने अडवला चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा ताफा अन् म्हणाला..
एसपीजी सुरक्षेसंदर्भातील हे विधेयक गांधी परिवारातील ३ व्यक्तींना डोळ्यासमोर ठेऊन आणले गेले आहे, असा माध्यमे, काही लोक आणि सभागृहातील सदस्य यांचा समज आहे. मात्र, गांधी परिवार आणि एसपीजी यांचा काहीही संबंध नाही. एसपीजी कायद्यात यापूर्वीही ४ वेळा बदल करण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करण्याची ही पाचवी वेळ असून कुणाच्या कुटुंबाविषयी आकस ठेवून हे केलेले नाही. गांधी कुटुंबाचा विचार करूनच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, जी 'एएसएल आणि अँम्ब्युलन्स'सह 24 तास दिली जाणारी सुरक्षा असून ही देशातील एखाद्या व्यक्तीला दिली जाणारी सर्वोच्च सुरक्षा आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -आंध्रप्रदेशमध्ये बलात्काराची घटना; 50 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करून खून
एसपीजीवरून विनाकारण राजकारण केले जात आहे. विधेयकातील नव्या दुरुस्तीमुळे सर्वात जास्त कोणाचे नुकसान होणार असेल तर, ते नरेंद्र मोदी यांचे होणार आहे. जेव्हा ते पंतप्रधान पदी राहणार नाहीत, त्यावेळी त्यांची ही सुरक्षा काढून घेतली जाईल, जी त्यांना नंतर कधीही मिळणार नाही. काँग्रेस समर्थक उगीचच हा भावनिक विषय बनवत आहेत. या देशात फक्त गांधी कुंटुंबाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.