'काँग्रेस, आप, सपा, बसपा, ममता दीदी हे सगळे एकाच माळेचे मणी'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर टीकास्त्र सोडले.
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस, आप, सपा, बसपा आणि ममता दीदी हे सर्व जण एकाच माळेचे मणी आहेत, असे शाह म्हणाले.
काँग्रेस, आप, सपा, बसपा आणि ममता दीदी सर्व जण एकाच माळेचे मणी आहेत. या सर्वांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले नाही. भाजप पाकिस्तानमधून आलेल्या लोकांना नागरिकत्व देत आहे, असे केजरीवाल म्हणातात. मी केजरीवालांना सांगु इच्छितो की, दिल्लीमधील 30 टक्के लोक हे पाकिस्तानातून आलेले पंजाबी, शिख आणि हिंदू आहेत. ही लोक पाकिस्तानी नसून आमचे भाऊ-बहीन आहेत, असे शाह म्हणाले.
एकीकडे नरेंद्र मोदींचा भाजप पक्ष आहे. जो देशाच्या रक्षणासाठी समर्पित आणि कटिबद्ध आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि आप पक्ष आहे. जे शाहीन बागच्या पाठीशी आहेत. भाजप जे आश्वानस देते. ते पूर्ण करते. कारण, मोदी आहेत तर सर्व शक्य आहे. दिल्लीमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यास 5 वर्षांच्या आत आम्ही दिल्लीला जगातील सर्वात सुंदर राजधानी बनवू, असे शाह म्हणाले.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.