लखनऊ -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील बऱ्याच ठिकाणांना 'हॉटस्पॉट' घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागांमध्ये अगदी अत्यावश्यक सेवांसाठीही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशामुळे बऱ्याच लोकांनी तक्रार केल्यानंतर, या भागामधील लोकांना अत्यावश्यक गोष्टी घरपोच पोहचवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशच्या गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. वाय. यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले, की अत्यावश्यक वस्तू घरपोच पोहचवणाऱ्या लोकांना आम्ही हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्येदेखील जाण्यासाठी परवानगी देतो आहे. मात्र सोसायटीमधील नागरिकांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे नोएडामधील लोकांना दिलासा मिळाला आहे.