महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर: हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर चकमकीत ठार, एक जवान हुतात्मा - पुलवामा दहशतवादी ठार

पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील कमराजीपोरा गावात कारवाई करत दहशतवाद्याला ठार केले. मृत दहशतवादी आझाद ललहारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कमांडर आजाद ललहारी
कमांडर आजाद ललहारी

By

Published : Aug 12, 2020, 5:02 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर आजाद ललहारी ठार झाला आहे. चकमकी दरम्यान दोन जवान जखमी झाले. यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील कमराजीपोरा गावात कारवाई करत दहशतवाद्याला ठार केले. मृत दहशतवादी आझाद ललहारी असल्याची ओळख पटली आहे. पोलीस सुत्रांनुसार, रियाज नाईकू याच्यानंतर ललहारी हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कमांडर बनला होता. तसेच तो 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्यांच्या यादीमध्येही होता. ललहारी याच्या विरोधात ६ गुन्हे दाखल असल्याचे काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले.

२२ मे ला पुलवामा शहरात हेड कॉन्स्टेबल अनूप सिंह यांची हत्या झाली होती. यामध्ये ललहारी सहभागी होता. त्याला याआधी नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत अटकही करण्यात आली होती. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या कमांडर पदी काम सुरु केले होते.

एक जवान जखमी

दुसऱ्या एका घटनेत बारामुल्ला येथे गस्तपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. प्राथमिक माहिती नुसार हा हल्ला बारामुल्ला श्रीनगर महामार्गावर झाला. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या परिसराला वेढा घालण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details