पुणे - कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर जगभरातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी लस तयार करण्याचा ध्यास घेतला आहे. यात आघाडीवर आहे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनी. सीरम ही खासगी कंपनी असून पोलीओ, डिप्थेरिया, हिपॅटिटीस - बी, रुबेला, गोवर गालगुंड आणि बीसीजीसह अनेक आजारांवर लस तयार करते. लस निर्मितीतील सीरम आघाडीची कंपनी आहे. कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर सीरमनेही पूर्ण क्षमेतेने संशोधन सुरू केले आहे.
सीरम कंपनीचा इतिहास
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी १९६६ साली डॉ. सायरस पुनावाला यांनी सुरू केली. माणसाचा जीव वाचवणारी मूलभूत अशी औषधे आणि लसी तयार करण्याचा उद्देश पुनावाला यांच्या डोळ्यापुढे होता. १९६० आणि ७० च्या दशकात भारत औषध निर्मिती क्षेत्रात पिछाडीवर होता. अनेक औषधे आणि लसी जास्त किंमत मोजून परदेशातून आयात कराव्या लागत होत्या. त्यामुळे सीरमने सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत औषधे तयार करण्यास सुरुवात केली आणि तेही मोठ्या प्रमाणात. काही दिवसांनी भारत टिटॅनस अँटी-टॉक्सिन आणि साप चावल्यानंतर देण्यात येणाऱ्या लसीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. ही भारतासाठी मोठी आशादायक बाब होती. त्यानंर कंपनीने डीटीपी ही लस तयार केली. त्यानंतर एमएमआर ही लस बनविण्यात यश मिळविले.
बिल्थोवेन कंपनीचा ताबा सीरमकडे
सीरम कंपनीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिल्थोवेन बायोलॉजिकल्स ही कंपनी ताब्यात घेतली. २०१२ साली हा व्यवहार झाला. बिल्थोवेन ही नेदरलँड सरकारच्या मालकीची कंपनी होती. मात्र, तीला सीरमने विकत घेतली. बिल्थोवेन कंपनीची मालकी घेतल्यानंतर पोलीओ लस निर्मितीमध्ये सीरमने मोठी भरारी घेतली. ही कंपनी युरोपात ४० एकरावर उभारलेली होती. दरवर्षी २ कोटी लसींची निर्मिती करण्याची क्षमता या कंपनीची होती. तसेच कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होती. त्याचा सीरमला फायदा झाला. लहान बालकांसाठी लस निर्मिती करण्याची सीरमची क्षमता वाढली. बिल्थोवेन कंपनीचा ताबा घेतल्यानंतर सीरमचा युरोपीयन बाजारपेठेतही प्रवेश सुकर झाला. युरोपात लसींचे उत्पादन करून विक्री सुरू झाली.
जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी आहे. जगभरात लाखो डोस कंपनी वितरित करते. १३० कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस कंपनी जगभरात वितरित करते. त्यात पोलीओ, बीसीजी, हिपॅटिटीस बी, गोवर, रुबेला यांसारख्या लसींचा समावेश आहे. जगातील एकूण बालकांपैकी ६५ टक्के बालकांना सीरम कंपनीने बनविलेली एकतरी लस देण्यात येते, असा अंदाज वर्तवला जातो.