नवी दिल्ली - इतिहासात पहिल्यांदाच भारतातील सर्व रेल्वे गाड्या अगदी वेळेवर धावल्यामुळे नवा इतिहास रचला गेला आहे. १०० टक्के पंक्चुअलिटी नोंदवण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. बुधवारी धावलेल्या सर्व २०१ गाड्या अगदी वेळेत निघाल्यामुळे हा विक्रम नोंदवला गेला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, यापूर्वीचा सर्वाधिक पंक्चुअलिटी रेट हा ९९.५४ टक्के होता. २३ जून २०२०ला केवळ एक गाडी उशीरा धावल्याने १०० टक्के गाठण्यास अपयश आले होते. मात्र, काल एकही गाडी उशीरा न धावल्याने १०० टक्के पंक्चुअलिटीची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेने आपली प्रवासी वाहतूक सेवा १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवली आहे. सध्या देशभरात केवळ २३० विशेष गाड्या धावत आहेत. ही संख्या देशातील एकूण रेल्वेगाड्यांच्या (१३,०००) दोन टक्केही नाही. एक जुलैला धावलेल्या गाड्यांची संख्या ही अगदी कमी असली, तरी १०० टक्के पंक्चुअलिटी गाठण्याचा विक्रम आम्ही केला आहे. आता पुढे प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतरही हा रेट असाच ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, असे रेल्वेचे कार्यकारी संचालक आर. डी. वाजपायी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
भारतीय रेल्वेने घडवला इतिहास; पहिल्यांदाच सर्व गाड्या धावल्या अगदी वेळेवर!
लॉकडाऊनच्या कालावधीचा वापर करुन घेत, आम्ही बऱ्याच रेल्वेमार्गांवर दुरुस्त्या करुन घेतल्या आहेत. कित्येक ठिकाणचे सिग्नलही दुरुस्त करण्यात आले आहेत, असेही वाजपायींनी स्पष्ट केले.
हेही वाचा :'स्पाईस जेट'ने लॉकडाऊन काळात 30 हजार भारतीयांना आणले मायदेशी