'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '
अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी कोरोना विषाणूवर उपाचार करण्यासाठी अजब दावा केला आहे.
नवी दिल्ली -चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणुची झळ आपल्या नागरिकांना बसू नये, यासाठी विषाणूवर अचूक उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अद्याप संशोधन करत आहेत. तर अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी या विषाणूवर उपाचार करण्यासाठी अजब दावा केला आहे. कोरोना विषाणूचा उपचार गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
जगातून कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी खास यज्ञाचे आयोजन केले जाईल. कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेला एखाद्या रुग्णांच्या शरीरावर गाईचा गोबर लावला आणि 'ओम नम: शिवाय' हा जप केला तर त्याचे प्राण वाचतील, असा दावा स्वामी चक्रपाणी महाराजांनी केला आहे. त्यांचे हे विचित्र विधान आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
चीनमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला असून तब्बल दहा हजारांच्या आसपास लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जगभरातील देश आपापल्या नागरिकांना चीनमधून परत मायदेशी आणण्याचा प्रयत्न करत आहेत.