श्रीनगर (उत्तराखंड) :आज 5 जुन म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. उत्तराखंड राज्यात असलेली वन संपदा आणि जैवविविधता, यामुळे या राज्याची जगात एक वेगळीच ओळख आहे. परंतु, मागील काही वर्षांमध्ये उत्तराखंड राज्यातील जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे.
गढवाल विद्यापीठाच्या हाय पीक प्लांट फिजिक्स रिसर्च सेंटरच्या (एचएपीपीआरसी) गेल्या दहा वर्षांच्या अभ्यासात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, हिमालयाच्या जैवविविधतेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खरसु, मोरू आणि रागा या झाडांची बिया तयार होण्याची क्षमता हळूहळू कमी होत आहेत. ज्यामुळे हिमालयातील जैवविविधतेस मोठा धोका निर्माण होणार आहे.
हिमालयातील जैवविविधता धोक्यात; गढवाल विद्यापीठात झालेल्या संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर हेही वाचा...जागतिक पर्यावरण दिन: थोडं थांबा...अन् जैवविविधतेकडं लक्ष द्या
उत्तराखंड राज्यातील उच्च हिमालयीन प्रदेश रांगांमध्ये एचएपीपीआरसीने केलेल्या संशोधनातून आणि अभ्यासातून अनेक गोष्टी प्रकाश झोतात आल्या आहेत. यानुसार, उच्च हिमालयीन प्रदेशात वाढते पर्यटन आणि मानवाचा वाढता व्यवहार, यामुळे अनेक वृक्ष, वनस्पतींसह मौल्यवान औषधी वनस्पतींचेही अस्तित्वही धोक्यात आले आहे. बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे काही वृक्षांचे संगोपन व्यवस्थित होत नाही. तर नैसर्गिकरित्या नवीन झाडांची वाढ होत नाही किंवा त्यांना आवश्यक ते वातावरण राहिलेले नाही. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
गढवाल विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय कांत पुरोहित यांनी सांगितले की, याचा सर्वात मोठा परिणाम हार्की दून, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, तुंगनाथ, रुद्रनाथ, चोपता बुग्याल, पिंडारी, दर्मा, व्यास, मुनस्यारी, दयारा बुग्याल आदी पर्यटनस्थळांवर दिसून येत आहे. या ठिकाणी मानवाचा हस्तक्षेप वाढला आहे. ज्याकडे राज्य सरकार आणि पंचायत देखील व्यवस्थित लक्ष देत नाही. त्यामुळे येथे लवकरच मानवी हस्तक्षेपाला आळा घातला नाही, तर बुग्याल आणि या भागातील जैवविविधता संपुष्टात येईल.