शिमला - कंगना प्रकरणाचे पडसाद हिमाचलप्रदेशमध्येही उमटले आहेत. राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध हिमाचल भाजपाकडून नोंदवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारचा विरोध करत हिमाचल भाजपा आज रस्त्यावर उतरली आहे. याबाबत प्रदेश भाजपाने ब्लॉक स्तरावर हे आंदोलन सुरू आहे.
कंगना प्रकरणाचे पडसाद हिमाचलमध्ये...प्रदेश भाजपाचे महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन मुंबई स्थित वांद्र्याच्या पाली हिल वरील कंगनाच्या घरावर तोडक कारवाई करण्यात आली. याच दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित कारवाईला स्थगिती दिली. आता हा वाद न्यायालयात गेला आहे. एका दिवसाच्या नोटीसीवर बृहन्मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने सर्वत्र प्रश्निचिन्ह उपस्थित होत आहे.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत कंगनाचा मुद्दा सलग तिसऱ्या दिवशी उपस्थित करण्यात आला आहे. बुधवारी कंगनाच्या अनधिकृत घरावर कारवाई केल्यानंतर विधानसभेत तिच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी देखील महाराष्ट्र सरकार कंगनाच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करत कंगनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवल्याचे चित्र होते. आता हिमाचल प्रदेश भाजपा महाराष्ट्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहे.
हिमाचल प्रदेशचे वनमंत्री राकेश पठानिया यांनी कंगनाच्या घरावरील कारवाईला खालच्या पातळीवरी कारवाई असे संबोधले आहे. तसेच हिमाचलसह संपूर्ण देश कंगनाच्या पाठिशी उभा असल्याचे ते म्हणाले. आम्हाला कंगनावर गर्व असल्याचे सांगत त्यांनी भाजपातर्फे पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, कंगनाने मुंबईला पाकिस्तान संबोधल्याच्या वक्तव्यासह मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलण्यावर अध्याप कोणत्याच भाजप नेत्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही.