पणजी - शहरापासून जवळील जुआरी नदीच्या काठी असलेल्या काकरा गावाचे सोसा्टयाच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या या वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पुढील दोन ते तीन दिवस वादळाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार मध्यारात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पाऊस झाला. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता, की नारळाची झाडे तूटून पडली. तर काही घरांवर झाडे कोसळली. वाऱ्यामुळे एका झोपडीचा उडालेला पत्रा सुमारे ५० फुटांहून अधिक उंचीच्या झाडावर जाऊन अडकला.
काकरा- ताळगाव परिसरात मोठे नुकसान पणजी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्याला सुरुवात केली आहे. जोरदार वाऱ्यामुळे पक्षांचाही मृत्यू झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर कावळे मृत अवस्थेत आढळून आले. झाडे उन्मळून पडल्यानेही पक्षांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी वादळ झाले नसून वेगाने वारे वाहत होते. याबाबत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. पुढील दोन तीन दिवस सोसाट्याचा वारा राहणार असून मुसळधार पावसाचीही शक्यता आहे, असे गोवा वेधशाळेचे संचालक कृष्णमूर्ती पडगलवार यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. संततधार पावसामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वेगवान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात लाटा उसळत आहेत.
दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मागील चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद सांगे येथे २१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर वाळपई येथे अद्यापपर्यंत पाऊस पडलेला नाही.