एअर स्ट्राईक : दिल्ली मुंबईसह देशात हायअलर्ट जारी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
महाराष्ट्र राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट, बसस्थानक परिसरात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई - भारतीय हवाईदलाकडून मंगळवारी पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्याच्या तळावर एअर स्ट्राईक करण्यात आला. हा हल्ला जैशकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रतिउत्तर असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणेकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट, बसस्थानक परिसरात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासंदर्भातील दक्षतेच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. पुढील काही काळ अत्यंत महत्त्वाचा असून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हल्ला केल्या जाण्याची शक्यता आहे. शिवाय काश्मीर खोऱ्यात इतर काही दहशतवादी आहेत जे कोणत्याही हल्ल्यासाठी सज्ज असू शकतात. या पार्श्वभूमीवर हा हाय अलर्ट देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते सुरक्षेबाबत काय तयारी झाली आहे, समजा एखादा हल्ला झाला तर काय करता येईल यासंदर्भातली चर्चा होणार आहे.
रेल्वे स्थानक विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विमानतळांवर टर्मिनल बिल्डिंग, एयरसाइड, सर्व प्रकारचे परिचालन क्षेत्र आणि विमानात प्रवेश करताना कडक तपास तसेच पार्किंग क्षेत्रामध्ये तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रवासी, कर्मचारी यांचा कसून तपास करण्यात येत आहे. मालवाहक, कार्गो टर्मिनल इत्यादी विभागाची कडक चौकशी केली जात आहे. दरम्यान, हवाई दलाने सर्व हवाई सुरक्षा तळांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास नियंत्रण रेषेवर सर्व हवाई तळे तयार असायला हवी, यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.