नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भाजपच्या दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या 68 व्या जन्मदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. 'त्यांची असामान्य दूरदृष्टी नेहमीच प्रेरणा देत राहील', असे ट्विट जयशंकर यांनी केले आहे. 14 फेब्रुवारी 1952 ला सुषमाजींचा जन्म झाला होता. 6 ऑगस्ट 2019 ला त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
सुषमा स्वराज भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला पराराष्ट्र मंत्री होत्या. मृत्यूपूर्वी बऱ्याच काळापासून त्यांना प्रकृती अस्वास्थ्याने घेरले होते. यामुळे त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवले होते.
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स, तातडीने प्रतिसाद आणि मदतीसाठी नेहमी तत्पर परराष्ट्र मंत्री
सुषमाजी यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने गुरुवारी 'प्रवासी भारतीय केंद्र' आणि 'परराष्ट्र सेवा संस्था' यांचे त्यांच्या नावावरून नामकरण केले. सुषमाजी यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून भारतासाठी मुत्सद्दीपणे धोरणे आखतानाच दुर्मिळ सहानुभूती आणि मानवी दृष्टिकोन बाळगणार्या नेतृत्वाचे दर्शन घडवले होते. जगभरात ट्विटरवरून सर्वाधिक फॉलोअर्स मिळालेल्या त्या एकमेव परराष्ट्र मंत्री ठरल्या. भारताबाहेरील भारतीयांना तातडीने प्रतिसाद देणाऱ्या आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या परराष्ट्र मंत्री म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.