रांची - 'झारखंड मुक्ती मोर्चा'चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून आज (रविवारी) शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांना शपथ दिली. सोरेन सरकारमध्ये तीन आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
हेमंत सोरेन झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री; शपथविधीला राहुल, ममता, स्टॅलीनसह दिग्गज नेते उपस्थित - हेमंत सोरेन शपथविधी सोहळा
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. सोरेन यांच्यासह ३ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
काँग्रेसचे आमदार आलमगीर आलम आणि रामेश्वर उराव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रीय जनता दल पक्षाचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवत आहेत. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अशोक गेहलोत, एम. के. स्टॅलिन, भूपेश बघेल, संजय सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते शपतविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात सोरेन यांनी या कार्यक्रमाला 'संकल्प दिवस' असे म्हटले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे पक्ष एकत्र लढले होते. यात ८१ पैकी ४७ जागा जिंकून त्यांनी आरामात बहुमत मिळवले, आणि भाजपला आणखी एका राज्यातून आपली सत्ता गमवावी लागली. या ४७ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाला ३०, काँग्रेसला १६ तर राजदला एक जागा मिळाली होती.