हैदराबाद- हैदराबादमध्ये मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) मुसळधार पाऊस झाला. हैदराबादच्या घटकेसरजवळील सिंगापूर टाऊनशिप येथे 30.9 सें.मी., अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे हैदराबाद व आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली.
हैदराबादच्या हयातनगर, हस्तीनापूरम भागात 26 सेंमी पावसाची नोंद झाली आहे. इब्राहीमपुरा येथे 24.3 सेंमी व अब्दुल्लापूरमेट येथे 24 सेंमी पावसाची नोंद झाली आहे. सरूरनगर विभागात 23.5 सेमी व उप्पल विभागात 21.9 सेमी पाऊस झाला आहे. अचानक बरसलेल्या या पावसामुळे तळमजल्यावर राहणाऱ्यांच्या घरामध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने या कठीण परिस्थितीत आणखी भर पडली. शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जलाशयाचे रूप आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने मोठी वाहनेही रस्त्यावर अडकून पडली होती.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो हळूहळू दक्षिण किनारपट्टीकडे सरकत आहे. परिणामी येत्या तीन ते चार दिवसात तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रसह इतर राज्याला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.