कानपूर- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभर संचारबंदी लागू केल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. लुधियानात अडकलेले मध्यप्रदेशातील मजूर पायी घराकडे निघाले आहेत. मात्र या मजुरांच्या खांद्यावर खाटेची झोळी केलेली असून त्यामध्ये मान मोडलेला मुलगा आहे. त्याला कोणतीही हालचाल करता येत नसल्यामुळे त्याला खाटेची झोळी करत चक्क १५ दिवसापासून हे १७ ते १८ मजूर पायी चालत येत आहेत. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
खाटेवर मान मोडलेला मुलगा, लुधियाना ते मध्यप्रदेश पायी प्रवास. . 'कणा' मोडलेल्या मजुरांची हृदयद्रावक कहाणी - संसार
लुधियानात अडकलेले मध्यप्रदेशातील मजूर पायी घराकडे निघाले आहेत. मात्र या मजुरांच्या खांद्यावर खाटेची झोळी केलेली असून त्यामध्ये मान मोडलेला मुलगा आहे. चक्क १५ दिवसापासून हे १७ ते १८ मजूर पायी चालत येत आहेत. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
मध्यप्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील मजूर लुधियानात पोट भरण्यासाठी गेले होते. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत या मजुरांचे काम सुटले आहे. यातील एका मजुराचा मुलगा पडल्याने त्याचा मानेचा मनका मोडला आहे. त्यामुळे काही बरेवाईट झाले, तर करायचे काय, असे म्हणत या मजुरांनी आपला गाव जवळ करायचे ठरवले. मात्र जवळ पुरेसा पैसा तर सोडाच खाण्यास अन्नही नसलेल्या या मजुरांनी लुधियाना ते सिंगरोली असा पायी प्रवास सुरू केला.
मान मोडलेल्या मुलाला त्यांना खाटेची झोळी करुन त्यावर झोपवले. तशाच अवस्थेत आळीपाळीने हे मजूर खाटेला खांद्यावर घेत लुधियानावरुन सिंगरोलीकडे पायी प्रवास करत आहेत. तब्बल १५ दिवस प्रवास करत हे मजूर कानपूरला येऊन पोहोचले आहेत. रस्त्यात खाण्यासाठी कोणी काही दिले तर खायचे, नाहीतर पुन्हा प्रवास करायचा असा या मजुरांचा दिनक्रम सुरू आहे. मात्र त्यांना प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. कानपूरमध्ये पोलिसांनी अडवून त्यांची चौकशी केली, मात्र कोणतीही मदत केली नसल्याचे पुढे आले आहे.