हैदराबाद : प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलदगतीने नेणे गरजेचे असते. अशा वेळी 'ग्रीन कॉरिडॉर'चा वापर करण्यात येतो. हैदराबादमध्ये या ग्रीन कॉरिडॉरसाठी चक्क मेट्रोचा वापर करण्यात आला. शहरातील एलबी नगर येथे असलेल्या कामिनेनी रुग्णालयातून हे हृदय ज्युबली हिल्स येथे असलेल्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले.
हैदराबादमधील पहिलाच प्रयत्न..
या हृदयाच्या वाहतुकीसाठी नागोल मेट्रो स्थानकापासून ज्युबली हिल्स चेक पोस्टपर्यंत एका विनाथांबा मेट्रोची व्यवस्था करण्यात आली होती. अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती. अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर मेट्रो प्रशासनाने अशी गाडी सोडण्यास परवानगी दिली. रस्त्यावरची वाहतूक कोंडी टाळून, कमीत कमी वेळेत हृदय अपोलो रुग्णालयात नेण्यासाठी मेट्रो वापरण्याचा पर्याय निवडण्यात आला. ग्रीन कॉरिडॉर म्हणून मेट्रोचा वापर करण्याचा हा हैदराबादमधील पहिलाच प्रयोग होता.