नवी दिल्ली: आपल्या राहत्या संकुलातील मोकळ्या परिसरात छोट्या आकाराची कोविड केअर सुविधा सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड केअर सुविधा ही एक समर्पित आरोग्य सुविधा केंद्र असेल. ज्या माध्यमातून संकुलातील रहिवाशांमध्ये कोरोना संशयित, असिम्प्टोमॅटिक (लक्षणं न दर्शवणारा), प्रिसिम्प्टोमॅटिक आणि कोरोना विषाणूची अत्यंत सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांची काळजी घेतली जाईल. तसेच त्यांचे व्यवस्थापन केले जाईल. ही सेवा आरडब्ल्यूए, निवासी संस्था किंवा स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या संसाधनांचा वापर करून याची स्थापना केली जाईल.
“ही सुविधा वृद्ध रूग्ण, लहान मुले (१० वर्षांपेक्षा कमी), गर्भवती/स्तनपान देणाऱ्या स्त्रिया, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड रोग, श्वसन रोग, कर्करोग अशा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांसाठी नाही. विशिष्ट आरोग्य स्थिती असणाऱ्या रुग्णांनाच या कोविड केअर सुविधा केंद्रात दाखल केले जाईल,” असे मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट म्हटले आहे.
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढे म्हटले आहे की, ही कोविड केअर सुविधा ही एक अस्थायी स्वरुपाची असेल. जी निवासी संकुलाच्या आवारात असलेला सामुदायिक हॉल, मधली मोकळी जागा, सामुहीक वापराचे ठिकाण किंवा रिकाम्या फ्लॅट्समध्ये स्थापित केले जाईल. जी उर्वरित निवासस्थानापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल.
“या कोविड केअर सुविधा केंद्रात ये- जा करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असायला हवे. तसेच प्रवेशद्वाराजवळ हॅन्ड हायजीन (सेनिटायझर डिस्पेंसर) बंधनकारक असेल. शिवाय तेथे काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंगची तरतूद असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक बेड्स एकमेकांपासून कमीतकमी १ मीटर (3 फूट) अंतरावर असायला हवेत,” असे मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.
या मार्गदर्शक सूचनांत पुढे म्हटले आहे की, वापरलेल्या चादरी, उशांचे खोळं (कव्हर), टॉवेल्स असे वापरातील कपडे ७२ तास डिस्पोजेबल बॅगमध्ये ठेवायला हवेत. त्यानंतरच सामान्यत: वापरल्या जाणार्या डिटर्जंट्सचा वापर करुन करून ती कपडे रुग्णाच्या घरी धुवायला हवीत. “वारंवार हाताचा स्पर्श होतो, अशा सामाईक ठिकाणांची (डोरकनॉब्स, लिफ्ट बटन्स, हँड्रॅल्स, बेंच, वॉशरूम फिक्स्चर इ.) दिवसातून किमान दोन वेळा स्वच्छ साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच नियमित निर्जंतुकीकरणही (एक टक्के सोडियम हायपोक्लोराइट वापरुन) करायला हवे.” असे त्यात म्हटले आहे. “या सुविधा केंद्रातील आणि आवारातील स्वच्छतागृहे, पाणी पिण्याच्या आणि हात धुण्याच्या जागा दिवसातून किमान तीन वेळा परिणामकारक पद्धतीने वारंवार स्वच्छ ठेवायला हवीत,” असेही त्यात म्हटले आहे.
पुढे मार्गदर्शक सूचनांत असे नमूद केले आहे की, “हे सुविधा केंद्रावर नियमितपणे देखरेख ठेवायला हवी. तसेच नोंदणीकृत श्वसन थेरपिस्ट (आरआरटी) द्वारे या सुविधा केंद्राची नियमितपणे तपासणी करायला हवी. शिवाय या थेरपिस्टकडून आरडब्ल्यूए आणि निवासी संस्थांना मार्गदर्शन करण्यात यावे.” “जर आरआरटीला कळले की, हे सुविधा केंद्र एकतर योग्य नाही किंवा आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध नाहीत. अशावेळी ते आरडब्ल्यूए आणि निवासी संस्थांना ही संबंधित सुविधा बंद करण्याचा सल्ला देऊ शकतात,” असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
रुग्णांनी नेहमीच तीन स्तरीय वैद्यकीय मास्क वापरायला पाहिजे. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक मास्क ८ तास वापरल्यानंतर किंवा तत्पूर्वी ओला झाला अथवा मातीत पडला तर टाकूण द्यावा. मास्क टाकून देण्यापूर्वी १ टक्के सोडियम हायपोक्लोराइटमध्ये निर्जंतुकीकरण केल्यानंतरच मास्क टाकून द्यावा.” “रूग्णांनी केवळ त्यांना नेमून दिलेल्याच अंथरुणावर रहावे आणि इतर लोकांशी, विशेषत: वयस्कर आणि विविध इतर आजार असणाऱ्या रुग्णांशी संपर्क टाळणे” आवश्यक असल्याचेही यात नमूद केले आहे. आरोग्य मंत्रालयाने अशा निवासी संकुलांसाठी एक सल्लागाराची निवड करण्याचे देखील म्हटले आहे.
त्याचबरोबर “६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, इतर विविध आजार असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना केवळ घरीच राहण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे. तसेच पाहुण्यांशी आणि घरी येणाऱ्या इतर लोकांशी कमीत कमी संपर्क ठेवण्यास सांगावे. याबद्दलचा सल्ला आरडब्ल्यूएकडून सर्व सदस्यांना दिला जाऊ शकतो,” असे सल्लागारांनी सांगितले.
पुढे सल्लागारांनी सांगितले की, व्हिजिटर्स / कर्मचार्यांची थर्मल स्क्रिनिंग प्रवेशद्वारावरच करावी. तसेच ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत केवळ अशा व्यक्तींनाच आवारात प्रवेश देण्यात यावा. “विक्रेते, घरगुती मदतनीस, कार क्लीनर, डिलिव्हरी कर्मचारी आदी लोकांनी देखील दररोज अशाप्रकारचे स्क्रिनिंग घ्यायला हवे. उद्याने (पार्क्स), कॉरिडॉर, लिफ्ट लॉबी, जिम, क्लब अशा इतर सर्व सामाईक भागात कमीतकमी ६ फूटांचे शारीरिक अंतर राखावे,” असेही त्यांनी सांगितले.
सल्लागार पुढे म्हणाले की, पार्क्स वगैरे सारख्या सार्वजनिक ठिकाणी बसण्याची व्यवस्था अशी असावी त्याद्वारे पुरेसे शारिरीक अंतर राखले जाईल. त्याचबरोबर “लिफ्टमध्ये किती लोकांनी जावे ? ही संख्या मर्यादित ठेवून त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच सामाजिक अंतराचे निकष नियमितपणे पाळले जावीत. मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणं उदा. दरवाज्यांचे हँडल्स, बेंच, लिफ्टची बटणं, इलेक्ट्रिक स्विचेस, रेलिंग आदी सामाईक सोयी- सुविधा वारंवार स्वच्छ केल्या पाहिजेत. तसेच या सुविधा स्वच्छ केल्या आहेत का? याची वारंवार खात्री करुन घ्यावी,” असेही त्यात म्हटले आहे.