जिनिव्हा -जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत कोरोनाला लढा देत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे केरळच्या परिचारिका आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे समोर आले आहे, की जगभरात काम करणाऱ्या परिचारिकांमध्ये बहुतांश भारतीय परिचारिकांचा समावेश आहे. यामध्येही केरळमधील परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे. केरळमध्ये शिक्षण घेतलेल्या एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी अमेरिकेत ३० टक्के, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये १५ टक्के, तर मध्य-पूर्व आशियामध्ये सुमारे १२ टक्के परिचारिका काम करतात.
ब्रिटीश संसदेच्या माजी सदस्या अॅना सौब्री यांनी केरळच्या परिचारिकांनी ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक केले होते. ब्रिटनच्या आरोग्यव्यवस्थेला मजबूत करण्यामध्ये केरळच्या परिचारिकांचा वाटा सर्वाधिक असल्याचे त्या म्हटल्या होत्या. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.