लखनऊ :उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील अत्याचार पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली होती. मंगळवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सायंकाळी तिचा मृतदेह आपल्या गावी नेण्यात येणार होता. मात्र, तिचा मृतदेह गावी पोहोचण्यास उशीर झाला. मंगळवारी रात्री गावामध्ये तिचा मृतदेह आणण्यात आल्यानंतर, प्रशासनाने लगोलाग तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन टाकले. विशेष म्हणजे, तिचे कुटुंबीय आणि गावकरीही अशा प्रकारे रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते, मात्र गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
मंगळवारी रात्री तिचा मृतदेह तिच्या गावामध्ये आणण्यात आला. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे होते, की अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी सकाळी केला जावा, रात्री नको. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही, आणि रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार करुन टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिच्या कुटुंबियांनाही अंत्यविधीच्या ठिकाणी येऊ दिले नाही. तसेच, पोलिसांनी मीडियालाही त्याठिकाणी येण्यापासून मज्जाव केला होता.