प्रियंका, राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल, पीडित कुटुंबीयांची घेतली भेट
प्रियंका, राहुल गांधींनी हाथरस पीडित कुटुंबीयांची घेतली भेट, सुमारे एक तास चर्चा - हाथरस प्रकरण लाईव्ह अपडेट
19:49 October 03
19:26 October 03
प्रियंका, राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल, पीडित कुटुंबीयांची घेतली भेट
पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला. मात्र, त्यांनी बोलण्यास नकार दिला. सध्या ते पीडित कुटुंबाशी चर्चा करत आहेत.
19:16 October 03
हाथरस पीडितेच्या भावाची प्रतिक्रिया
'ज्या पद्धतीने तपास सुरू आहे, त्यावरून आम्ही समाधानी नाही. अद्याप आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही. जिल्ह्याअधिकाऱयांनी आम्हाला उघडपणे धमकी दिली, त्यांना अद्याप निलंबीत करण्यात आले नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या भावाने दिली आहे.
19:04 October 03
कानपूरमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, सात दिवसांपासून होती बेपत्ता
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेनंतर कानपूरमध्येही एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. बाजरीच्या शेतात दलित मुलीचे अवशेष आढळून आले आहेत. मागील आठ दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. न्यायवैद्यकीय विभागाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
18:54 October 03
दलित अत्याचारावरून राजकारण करू नका - रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदार आठवले यांनी दलित अत्याचारावरून राजकरण करू नका असे म्हटले आहे. हाथरसमध्ये जे काही घटले ते भयंकर आहे. दलित मुलींवरील बलात्काराचा विषय अतिशय गंभीर आहे, असेही ते म्हणाले.
18:18 October 03
उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त सचिवांनी घेतली पीडित कुटुंबीयांची घेतली भेट
हाथरस प्रकरणी विशेष तपास पथक पीडित कुटुंबियांनी उठवलेल्या सर्व मुद्द्यांवर लक्ष देईल, असे उत्तर प्रदेश राज्याचे अतिरिक्त सचिव यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पीडित कुंटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
17:41 October 03
हाथरस सामूहिक बलात्काराविरोधात ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात रॅली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हाथरस बलात्काराच्या विरोधात कोलकाता शहरात रॅलीचे काढली आहे. शहरातील बिर्ला प्लॅनेटेरियम ते मेयो रोडवरील गांधी पुतळ्यापर्यंत २ किमीची ही रॅली असणार आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर टीका जोरदार टीका केली.
17:30 October 03
राहुल गांधी हाथरसकडे रवाना
काल हाथरसला जाण्यापासून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना रोखले होते. मात्र, आज पोलिसांनी त्यांना हाथरसला जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र, फक्त पाचच व्यक्ती जाऊ शकतात. असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सीमेवर अडविले आहे. कांग्रेस कार्यकर्ते योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
15:46 October 03
सुमारे ५० खासदार हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेणार
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण देशातील वातावरण पेटले आहे. दिल्लीतील २४ अकबर रोडवर गर्दी होत असून सुमारे ५० खासदार हाथरसला जाणार आहेत, असे ट्विट काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केले आहे. अशा प्रकारचे अत्याचार होत असताना नागरिकांनी एकतेचे दर्शन घडवणे एकदम योग्य आहे. उत्तर प्रदेश सरकार योग्य पद्धतीने वागेल, अशी आशा करूया, असे ते म्हणाले.
15:16 October 03
प्रियंका, राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल, पीडित कुटुंबीयांची घेणार भेट
नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. आज(शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यास उत्तरप्रदेशला निघाले आहेत. मात्र, दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. सीमेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. हाथरसमधील दलित तरुणीवर गावातील चौघा सवर्ण तरुणांनी बलात्कार केला तसेच तिला गंभीर जखमी केले. या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात या घटनेवरून आंदोलन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार विरोधक टीका करत आहेत.
आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला निघाले आहेत. मात्र, त्यांना पोलीस सीमेवर अडविण्याची शक्यता आहे. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गावात संचारबंदी लागू केली असून राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जात नाही. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आज माध्यम प्रतिनिधींना गावात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने हाथरसच्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही पीडित कुटुंबाची आज भेट घेतली.
राहुल गांधी यांनी आज टि्वट करून हाथरसला जाण्याविषयी माहिती दिली. उत्तर प्रदेश प्रशासन आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबाशी ज्याप्रकारे वर्तन केले आहे. ते मला मान्य नाही. कोणत्याही भारतीयाने ते स्वीकारू नये. जगातील कोणतीच शक्ती मला हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्यापासून रोखू शकत नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. या टि्वटमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे.
माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना हाथरसला जाण्यापासून रोखण्याच्या निर्णयावर भाजप नेत्या उमा भारती यांनीही शंका व्यक्त केली आहे. राजकीय नेते आणि माध्यम प्रतिनिधींना हाथरसला जाऊ देण्याची विनंती त्यांनी योगी प्रशासनाकडे केली.