नवी दिल्ली :हाथरसमधील बलात्कार आणि हत्या प्रकरण हे जसे दाखवण्यात येत आहे तसे नसून, हे ऑनर किलिंगचे प्रकरण आहे असे आरोपीच्या वकीलांनी म्हटले आहे. ए. पी. सिंह, जे निर्भया प्रकरणातील आरोपींचे वकील आहेत, त्यांनीच हाथरस प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतले आहे.
या प्रकरणातील आरोपी संदीप सिंह याने हाथरसच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. या पत्रात त्याने पीडितेच्या आई आणि भावावरच तिची हत्या केल्याचा आरोप केला होता. या पत्राचा आधार घेत, ए. पी. सिंह यांनी हे प्रकरण ऑनर किलिंगचे असल्याचा दावा केला आहे. सिंह म्हणाले, की पोलीस तपासामध्ये घटनास्थळावरुन हत्येच्या वेळी केवळ पीडितेची आईच नाही, तर गावातील इतर काही लोकही उपस्थित होते. त्यांची चौकशी केल्यानंतर त्या रात्री नक्की काय घडले हे स्पष्ट होईल.
हाथरसची घटना हे 'ऑनर किलिंग'; आरोपींच्या वकिलांचा दावा पीडितेने आपल्या अखेरच्या जवाबात असे म्हटले आहे, की तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. तिने यात संदीपचे नावही घेतले होते, ज्यावरुन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत बोलताना ए. पी. सिंह म्हणाले, की पीडितेने आपल्या जवाबात संदीप हे नाव घेतले, मात्र नेमका कोणता संदीप हे त्यावरुन ठरवता येणार नाही. पीडितेच्या भावाचे नावही संदीप असल्याने ती कदाचित त्याने आपली हत्या केल्याचे सांगत असावी. हे नक्कीच ऑनर किलिंगचे प्रकरण आहे, आणि त्यामुळे पोलिसांनी आरोपी संदीप सिंहची विनंती मान्य करत त्याला न्याय मिळवून द्यावा.
दरम्यान, संदीप, लव-कुश, रवी आणि रामू या चार आरोपींनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. आरोपी संदीप याने पीडितेबरोबर आपली मैत्री होती. आपण तिला वेळोवेळी भेटत होतो, तसेच आपले फोनवरही बोलणे होत होते, असे पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. ज्या रात्री पीडितेची हत्या झाली, त्या रात्री पीडितेला भेटल्याचेही त्याने या पत्रात स्पष्ट केले आहे. यावेळी शेतात पीडितेची आई आणि भाऊही होते. आपले पीडितेला भेटणे तिच्या आई आणि भावाला आवडले नाही, त्यामुळे त्यांनी आपल्याला तिथून जाण्यास सांगितले. त्यानंतर आपल्याला गावातील लोकांकडून समजले, की पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारहाण केली. त्यात तिला गंभीर जखमा झाल्या आणि नंतर तिचा मृत्यू झाला. असे या आरोपींनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणात आपल्याला आणि आपल्या मित्रांना अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा :हाथरस पीडित कुटुंबीयांशी राहुल गांधी काय बोलले? पाहा व्हिडिओ