चंदीगड -हरियाणाच्या कैथल आणखी एका 'नकोशा कळी'च्या जिवावर उठलेल्या नातेवाईकांनी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले होते. मात्र, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी ही प्लॅस्टिक पिशवी बाहेर ओढून काढत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या ही मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू असून प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे.
येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला या मुलीला नाल्यामध्ये फेकताना दिसत आहे. त्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढले आणि पुन्हा भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे लोक जमा झाले. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. थोड्याचवेळात परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली.