चंदिगड -'दंगली तर होतच राहतात, त्या आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत' असे वक्तव्य हरियाणाचे उर्जा मंत्री, आणि अपक्ष आमदार रणजीत चौटाला यांनी केले आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की इंदिरा गांधींच्या काळात दिल्लीमध्ये कशी जाळपोळ झाली होती ते तर सर्वांनाच माहिती आहे.
हिंसा हा आपल्या आयुष्याचा एक भाग, दिल्लीतील दंगली सामान्य घटना; हरियाणाच्या मंत्र्याचे वक्तव्य! चौटाला यांच्यामते, दिल्लीमध्ये होत असलेला हिंसाचार ही एकंदरीत फार मोठी घटना नाही, असे वक्तव्य करताना, त्यांनी केंद्रसरकारचे कौतुकही केले आहे. चौटाला म्हणाले, की सरकारने आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच, दिल्लीतील कित्येक ठिकाणांवर संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.
पत्रकारांनी चौटाला यांना दिल्लीतील न्यायाधीशांच्या बदलीसंबंधी प्रश्न विचारला होता. ज्या न्यायाधीशांनी भाजपच्या भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती, त्यांची रातोरात बदली करण्यात आली होती. मात्र, यावर सरळ उत्तर न देता, विधानसभेच्या सत्रात आपण व्यस्त असल्यामुळे आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगत वेळ मारून नेली.
दिल्लीतील हिंसाचाराला भाजप नेत्यांनी केलेली भडकाऊ वक्तव्ये कारणीभूत असल्याची टीका काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानेही, भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा :'दिल्ली हिंसाचार ही देशासाठी लाजिरवाणी घटना', काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन