नूंह - हरियाणातील नूंह येथील २२ वर्षीय युवक रोजगारासाठी महाराष्ट्रात आला होता. मात्र, कोणत्याही माहिती किंवा पूर्वसूचनेशिवाय त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी पोहोचल्याची घटना घडली आहे. आसिफ असे मृत युवकाचे नाव आहे. तो नगीना गावचा रहिवासी होता.
रोजगारासाठी निघाला तरुण, १० दिवसांनी घरी पोहोचला मृतदेह महाराष्ट्रातून नगीना येथे पोहोचला मृतदेह
आसिफचे वडील हुकमुद्दीन यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. आसिफ 22 ऑक्टोबरला गावातील ड्रायव्हर मुख्तियार याच्या मुलासह ट्रकमधून महाराष्ट्रातील औरंगाबादला गेला होता. यानंतर 1 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या नंबरची अॅम्ब्युलन्स त्याचा मृतदेह घेऊन परत आली.
हुकमुद्दीन यांच्या सांगण्यानुसार, आसिफचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, त्याच्या नातेवाईकांना याविषयी कल्पना देण्यात आली नाही. तसेच, आसिफच्या मृत्यूविषयीही कळवण्यात आले नाही.
उपचारादरम्यान झाला मृत्यू
आसिफचा मृतदेह आल्यानंतर ट्रक ड्रायव्हर मुख्तियार याने आसिफची प्रकृती 29 ऑक्टोबरला संध्याकाळी खराब झाल्याचे सांगितले. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 ऑक्टोबरला आसिफचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 31 ऑक्टोबरला सकाळी औरंगाबादच्या रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
पीडित वडिलांचा आक्रोश
मुख्तियार याने मुलगा आजारी पडल्याची किंवा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला दिली नाही, असे पीडित वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी आसिफच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. नगीना ठाण्याचे एसएचओ कृष्ण कुमार यांनी आसिफच्या मृत्यूविषयी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुख्तियारचीही चौकशी सुरू आहे.
6 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
मृत आसिफचे 6 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. 22 ऑक्टोबरला आसिफ घरातून रोजगारासाठी बाहेर पडला. १० व्या दिवशी आसिफचा मृतदेह घरी पोहोचल्यानंतर त्याचे वडील हकमुद्दीन आणि पत्नी रिहानाच्या पायाखालची जमीनच सरकली.