चंढीगड- यूटी गेस्ट हाऊसमध्ये भाजप पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडली असून, या बैठकीत खट्टर यांची पुन्हा विधानसभेचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. काही वेळातच खट्टर राज्यपाल यांची भेट घेणार असून याभेटीदरम्यान ते सत्तास्थापनेचा दावा करतील, असे समजते. तर दुसरीकडे जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला आपल्या आमदारांच्या पाठिंबा असणारे पत्र राज्यपाल यांना देणार आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, उद्या (२७ ऑक्टोबर) रविवारी २ वाजता भाजप सत्ता स्थापन करणार असून शपथविधी प्रक्रिया उद्याच पार पडणार आहे. याची तयारी हरियाणा विधानसभेत सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी भाजपने जेजेपीसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून आज भाजप आणि जेजेपीच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. महत्वाचे म्हणजे, या बैठकीत अपक्ष आमदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.