श्रीनगर -कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम धार्मिक यात्रांवरही झाला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हज यात्रेवरुनही आता संभ्रम निर्माण झाला आहे. अशात जम्मू-काश्मीर हज समितीने, २०२० या वर्षी हज यात्रा रद्द करु इच्छित असलेल्या लोकांनी, आपले पैसै रिफंड मिळवण्यासाठी अर्ज करावे, असे सांगितले आहे. हज कमेटी ऑफ इंडिया आणि बेमिना हज हाऊसच्या वेबसाईटवरून हा अर्ज करता येणार आहे.
भारतीय हज समितीने सांगितल्याप्रमाणे, ज्यांना हज यात्रेची बुकिंग रद्द करायची असेल त्यांना १०० टक्के रिफंड दिला जाईल. यासाठी कॅन्सलेशन फॉर्म भरून हज कमिटीला ईमेल करता येईल. सोबतच, पासबुकची कॉपी किंवा कॅन्सल चेक सुद्धा या ईमेलला जोडावा लागणार आहे.
कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता सौदी अरेबिया सरकारने मार्चमध्ये सांगितले होते की, यावर्षी हज यात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. भारतीय हज कमिटीने सांगितल्याप्रमाणे, सौदी अरेबियाकडून अद्याप काहीच नवीन अपडेट मिळाले नाही. यासंदर्भात अनेक जणांकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे, ज्यांना हज यात्रा रद्द करायची आहे त्यांनी ती रद्द करून रिफंड घ्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.