हैदराबाद - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे स्थान आणि महत्व अनन्यसाधारण असे असते. प्रत्येक पावलांवर आपल्याला विविध गुरूंच्या रुपात नवी शिकवण मिळत असते. आज (रविवार) गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने तेलंगाणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेले मराठमोळे अधिकारी महेश भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'जवळ त्यांच्या गुरूंबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
डॉ. के. के. शाहांच्या त्या पत्राने आयुष्याला कलाटणी मिळाली...
मला माझे इतिहासाचे प्राध्यापक डॉ. के. के. शाहा यांची कायमच आठवण येते. मुंबईत आयएएस परीक्षेची तयारी करत असताना. 1993 साली मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेत (एसआयएसई) प्रवेश घेतला. मात्र, त्याचवर्षी वडिलांची सेवानिवृत्ती झाली आणि मला पुण्यातील एका कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यामुळे मी स्पर्धा परीक्षांची तयारी सोडली आणि पुण्यात आलो.
त्याचवेळी डॉ. के. के. शाहा यांचे एक पत्र माझ्या नावाने आले. त्यांच्या त्या पत्राने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली' असे महेश भागवत यांनी सांगितले.
तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी त्यांच्या गुरुजनांबद्दलच्या भावना ईटीव्ही भारतजवळ व्यक्त केल्या आहेत... हेही वाचा -मराठी पाऊल पडते पुढे...! महेश भागवतांची तेलंगाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती
त्यांचे ते पत्र आणि त्यांचे उपकार कधीच विसरु शकणार नाही...
डॉ. के. के. शाहा यांनी पाठवलेल्या पत्रात देशातील काही मोजक्या विद्यार्थ्यांची नावे लिहीली होती. ज्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले होते. त्यात माझ्या नावाचा देखील समावेश होऊ शकतो, असे शाहा सरांनी लिहिले होते.
त्यांच्या त्या पत्रामुले आपला आत्मविश्वास दुणावला. आपण पुन्हा नव्या जोमाने तयारी केली. 1994 ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्व परिक्षा दिली. पुण्यातील कंपनीचा राजीनामा देऊन मुंबई गाठली. त्यावर्षी आयोगाच्या परीक्षेत पास झालो. मुलाखतीनंतर 95 च्या तुकडीत माझी निवड झाली. शाहा सरांचे ते पत्र आणि त्यांचे उपकार आयुष्यभर लक्षात राहील, असे भागवत यांनी म्हटले.
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुंचे अनन्यसाधारण महत्व असते. जीवन जगत असताना आपण प्रत्येकाकडून काहीतरी शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही प्रमाणात आपला गुरू असतो. गुरू हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो, असेही महेश भागवत यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
महेश भागवत यांचा अल्पपरिचय :
महेश भागवत हे १९९५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. मुळ पाथर्डी येथील असलेल्या महेश भागवत यांचे आईवडील शिक्षक होते. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरींग केले. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील अनेक अधिकार्यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत. नुकतीच त्यांची तेलंगाणा राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.