गांधीनगर -उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर चप्पल फेकणाऱ्याला वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव रश्मीन पटेल असे असून तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वडोदराचे एसपी सुधीर देसाई यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले, 'वडोदराच्या करजण तहसीलमधील पुराली या गावात एका रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री जनतेला संबोधित करत होते. दरम्यान, गर्दीतून एकाने त्यांच्यावर चप्पल भिरकावली आणि पळून गेला. यानंतर आम्ही तत्काळ तपास सुरू केला. कल्पेश सोळंकी यांनी डेप्युटी एसपींकडे या तपासाचे कार्य सोपवण्यात आले होते. आयपीसीच्या कलमांनुसार पीपल्स रिप्रेझेन्टेटिव्ह अॅक्ट तसेच गुजरात पोलीस अधिनियमांतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. आम्ही कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजचे विश्लेषण सुरू केले. कार्यक्रमाची छायाचित्रे आणि इतर स्त्रोतांची माहिती गोळा केली.
दरम्यान, एका गुप्त माहितीनुसार करजन तालुक्यातील शीनोर गावातील रश्मीन पटेलबाबत माहिती मिळाली. रश्मीन पटेल हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याने उपमुख्यमंत्र्यांवर चप्पल भिरकावल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार, मंगळवारी आम्ही त्याला अटक केली आहे. त्याचा फोन जप्त करून तपास केला असता एक ऑडियो क्लिप आढळून आली आहे, ज्यात तो अमित पांड्याशी उपमुख्यमंत्र्यांवर चप्पल फेकण्याचा प्लॅन यशस्वी ठरल्याबाबात बोलत आहे, असे देसाई यांनी सांगितले.