सुरत (गुजरात)- शहरात एका महिला डॉक्टरला टोमणे मारून तिच्याशी उद्धटपणे वागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका दांपत्याला ताब्यात घतले आहे. चेतन मेहता आणि भावना मेहता असे अटक केलेल्या दांपत्याची नावे आहेत.
पीडित महिला डॉक्टर ही शहरातील सीव्हील रुग्णलयात काम करते. ती ज्या इमारतीत राहते त्याच मजल्यावर राहणारे मेहता दांपत्य तिला तू कोरोनाने संक्रमित आहे का? असे प्रश्न विचारून त्रास द्यायचे आणि तिला शिवीगाळ करायचे. याबाबत महिलेने दोन व्हिडिओ बनवून काल सोशल मीडियावर टाकले होते. यापैकी एक व्हिडिओत मेहता दांपत्य हे महिलेला शिवीगाळ करत असून तिच्या घरचे दार ठोकत असल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या व्हिडिओत महिला आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल दुख व्यक्त करत असल्याचे दिसते.
दोन दिवसा आधी चेतन मेहता याने तू सीव्हील रुग्णालयात काम करते, तुम्हाला कोरोना तर नाही ना? असा प्रश्न केला होता. त्यानंतर काल तुझ्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला, असा खोटा दावा चेतनची पत्नी भावना हिने माझ्यावर केला होता. त्यानंतर चेतनने मला सगळ्यांसमोर शिवीगाळही केली. मी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रग्णांचा उपचार करते म्हणून मला लक्ष्य केले जात आहे, असे महिला डॉक्टरने आपल्या व्हिडिओत सांगितले होते. याप्रकरणी पोलिसांनी चेतन मेहता आणि भावना मेहता यांना भा.द.वीच्या कलम १५१ अन्वये अटक केली आहे. त्यांना कार्यकारी दंडाधिकारी समोर हजर करण्यात येणार असून त्यांनी चांगल्या वर्तनाची हमी दिल्यास त्यांना जामीन दिली जाणार आहे, असे सुरतचे सहाय्यक पोलीस आयुक्त पी.एल चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा-खरीप हंगामावर कोरोनाचे सावट..