गांधीनगर - पंतप्रधान मोदी १५ डिसेंबरला जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाचे गुजरातमध्ये उद्घाटन करणार आहेत. कच्छ जिल्ह्यात सौर आणि पवन ऊर्जाचे जगातील सर्वात मोठे अक्षय्य ऊर्जा पार्क उभारण्यात आले आहे. या सोबतच डिसॅलिनेशन प्लांटचे (समुद्रातील खाऱ्या पाण्याचे रुपांतर पिण्यायोग्य पाण्यात करण्याचा प्रकल्प) उद्घाटन मोदी करणार आहेत.
३० हजार मेगा वॅटचा प्रकल्प
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी गुजरातमध्ये येत आहेत. जगातील सर्वात मोठा ३० हजार मेगावॅट क्षमतेचा अक्षय ऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मांडवी येथे डिसॅलिनेशन प्लांटचे उद्धाटन करणार आहेत.
मागील महिन्यात मोदींचा गुजरात दौरा
मागील महिन्यात पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जंयतीनिमित्त गुजरात राज्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी साबरमती नदीवर सुरू करण्यात आलेल्या सी प्लेन सेवेसह इतरही प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या केवडिया येथील पुतळ्याला मोदींनी भेट दिली होती.