नवी दिल्ली - परप्रांतीय कामगार आणि परदेशातून परत आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी सरकारने 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ग्रीन झोनमध्ये परत जाणाऱ्या लोकांसाठी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' संबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंगचा वापर केला जाईल. आजपर्यंत किंवा गेल्या २१ दिवसांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकही घटना घडलेली नाही, तिथे या टेस्टिंगचा वापर केला जाईल.
पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी बऱ्याच लोकांचे नमुने गोळा केले जातात. त्यातील एकाला संसर्ग असल्याची पुष्टी झाल्यास, त्यात सामील असलेल्या सर्व लोकांचे नमुने स्वतंत्रपणे तपासले जातात. मार्गदर्शक सूचनांनुसार या तपासणी पद्धतीत एकाचवेळी 25 जणांची निवड केली जाईल. आयसीएमआर तर्फे प्रशिक्षित प्रयोगशाळेतील कर्मचार्यांकडून लोकांचे स्वॅब घेतले जातील.
नाव, वय, लिंग आणि नमुना क्रमांक इत्यादी चाचणी बॉक्सवर लिहिणे आवश्यक आहे. 25 नमुने आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रिपल-लेयर्ड असतील आणि नियुक्त केलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जातील. त्याचा चाचणी अहवाल 24 तासांच्या आत संलग्न संस्थांपर्यंत पोहोचविला जाईल. यातील एकाही नमुन्यात संसर्ग आढळल्यास प्रयोगशाळेत ठेवलेल्या नमुन्यांमधून वैयक्तिक नमुने तपासले जातील, ही माहिती सरकारकडून जारी केलेल्या निवेदनपत्रात दिली आहे.