नवी दिल्ली - पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरात मुलांचे आंदोलन उभारलेल्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या १६ वर्षीय मुलीचा शाळेत न जाण्याचा हा ७१ आठवडा आहे. शाळेत जाऊन शिकून करायचे काय? उद्या आम्हाला भवितव्यच राहणार नाही, तर शाळेत जाऊ कशाला? असा थेट सवाल करत ती आंदोलन करत आहे. तिच्या आंदोलनाला जगभरातील मुलांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. भारतासह अनेक देशात मुलांनी शाळेत जाणे बंद करून हवामान बदलाविषयी आंदोलनात सहभागी होणे पसंत केले आहे.
आज पुन्हा ग्रेटाने ट्विट करून ‘आपल्या घरांना आग लागली आहे’, असे म्हटले आहे. ‘२०१९ मधील ही पाच अक्षरे’ असा हॅशटॅग त्याखाली तिने दिला आहे. ग्रेटाबरोबरच बिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, कांगो, भारत, रशिया, स्कॉटलंड अशा बऱ्याच देशात विविध ठिकाणी शाळकरी, महाविद्यालयीन मुले आंदोलन करत आहेत. ज्यांनी पर्यावरण नष्ट केले, जबाबदारीकडे दुर्लक्ष करून प्रगतीच्या नावाखाली अधिक कार्बन उत्सर्जन करून वातावरणात गंभीर स्वरूपाचे बदल घडवून आणले, पृथ्वीचे रूपांतर आगीच्या गोळ्यात केले, त्या गुन्हेगारांना भावी पिढ्या आता सरळ प्रश्न विचारत आहेत.
हेही वाचा -पर्यावरणाच्या ऱ्हासाकडं लक्ष दिलं नाही तर... आत्महत्या केल्यासारखं होईल
हवामान बदलाला अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत. आपल्या घराला आग लागली असताना आपण इतके निवांत गप्पा मारत कसे काय बसू शकतो? असा प्रश्न ग्रेटा वारंवार विचारत आहे. पर्यावरणाची सध्याची होत असलेली हानी आपल्या घराला लागलेल्या आगीहून कमी नसल्याची ती लोकांना जाणवून देत आहे. आज ज्या पद्धतीने कार्बनचे उत्सर्जन, विविध प्रकारची घातक प्रदूषणे सुरू आहेत, यामुळे पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. हे असेच चालू राहिले तर जास्त नाही, येत्या १० वर्षांतच म्हणजेच २०३० पर्यंत अशी स्थिती निर्माण होईल की, आपल्याला वाटले तरी पर्यावरण सुधारण्यासाठी आपण काहीच करू शकणार नाही आणि त्यानंतरचे परिणाम हे मानव जीवासह सर्व जीवसृष्टीसाठी घातक असणार आहेत, असे ग्रेटा हवामान शास्त्रज्ञ आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आयपीसीसीच्या अहवालाचा आधार देऊन सांगते.
स्पेनच्या माद्रिद येथे सीओपी २५ जागतिक परिषद झाली. तेव्हा भावी पिढ्यांनी आपला आवाज बुलंद केला आणि ग्रेटा थनबर्गने सर्व पर्यावरण व्यवस्था कोसळल्या असताना आम्ही संपूर्ण नाशाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहोत; तरीही, सारे काही आलबेल असल्याच्या खोट्या कहाण्या का सांगत आहात, असा सवाल केला होता.
हेही वाचा -पुढे मोठा धोका असूनही चुकीच्या मार्गावर; सीओपी २५ परिषदेत पॅरिस कराराकडं दुर्लक्ष