नवी दिल्ली -कोरोनाचे निदान करणाऱ्या चाचणी किट्सच्या निर्यातीवर तातडीने निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतातील कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता शनिवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे निदान करणारे किट्स (तसेच याच्याशी संबंधित प्रयोगशाळेतील अभिकर्मक) यांच्या निर्यातीवर तातडीने निर्बंध घालण्यात येत आहेत, अशी माहिती विदेश व्यापार महासंचलनालयाने (डीडीएफटी) दिली आहे. यामुळे भारतातून परदेशात होणारी किट्ससी निर्यात थांबणार आहे, ज्यांचा वापर देशातील रुग्णांवर करता येणार आहे.
यानंतर आता अशा किट्सना परदेशात निर्यात करायचे असल्यास विदेश व्यापार महासंचलनालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
कोरोना चाचणी कशी घेतात ?
जर एखाद्या व्यक्तीला ताप, शिंका, श्वास घेण्यास त्रास किंवा घसा दुखत असेल आणि तो कोरोना संशयित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात. ज्यामध्ये घशातील, नाकातील स्त्राव (स्वॅब), थुंकी किंवा अन्य वैद्यकिय नमुने गोळा केले जातात. त्यावरून त्या व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही, हे सिद्ध होते. अनेक वेळा अचूकतेसाठी एकापेक्षा जास्त चाचण्याही घेतल्या जाऊ शकतात.
भारताची कोरोना चाचणीची स्थिती काय?
भारताने आत्तापर्यंत 50 हजारांहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी घेतली आहे. यामध्ये दरदिवशी वाढ होत आहे. सरकारी आणि खासगी चाचणी केंद्रांची संख्या 200 पेक्षा कमी आहे. भारत जगात लोकसंख्येच्या मानाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा अनेक लहान देशांनी जास्त चाचणी केल्या आहेत. भारताने दर 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 20 चाचण्या घेतल्या आहेत. ही संख्या लोकसंख्येच्या मानाने नगण्य आहे. त्यामुळे आणखी लोकांना कोरोना झाला असून फक्त चाचणी न केल्यामुळे संसर्ग झाल्याचे निदान होत नसावे, अशी शक्यता आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर चाचणी घेण्यात येत आहे.
हेही वाचा :कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांची गरज आहे का? काय आहे इतर देशांची परिस्थिती