नवी दिल्ली -आता अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांची माहिती देऊन लोकांना पैसे कमवता येणार आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच यासाठी नवा कायदा अंमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, अशा प्रकारे पार्क केलेल्या गाडीमालकाला भरावा लागणाऱ्या दंडाच्या रकमेतील काही भाग हा तक्रारदाराला बक्षीस म्हणून मिळणार आहे.
येत्या वर्षभरात हा कायदा आणला जाईल. त्याआधी, सर्व राज्यांना पुरेशी पार्किंग व्यवस्था तयार करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिक अशा अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांची छायाचित्रे संबंधित प्रशासनाला पाठवून बक्षीस मिळवू शकतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
वेगाने विकसित होणाऱ्या शहरांसाठी पार्किंगची समस्या ही गंभीर झाली आहे. त्यामुळे, सरकारी कार्यालये, हॉटेल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अनेक मजली पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणे ही एक गरज बनली आहे, असेही गडकरी पुढे म्हणाले. यासोबतच, दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व गोडाऊन हे शहराबाहेर हलवण्यास सांगितले असल्याची माहितीही त्यांनी दिली.